Storytelling Goshtichi Shala

                         Goshtichi Shala



                             गोष्टींची शाळा

                   मी इयत्ता १ ली ते ४ थी च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर ता माण जि सातारा येथे एकटाच शिक्षक कार्यरत आहे. आमची पट संख्या ९ वरून ४० वर पोहचली आहे. तसा मी तंत्रज्ञान चा अभिनव वापर करून माझे काम करण्याचे अनेक प्रयोग  यशस्वी  केले  आहेत , तरीही ४ वर्गांना अध्यापन करणे म्हणजे मोठी कसरत होऊ लागली. म्हणजे एक प्रकारे समस्या निर्माण झाली. मग काय, समस्या असेल तरच माणूस धडपड करतो आणि धडपडीतूनच मार्ग सापडतो.आणि मग सुरु झाला आमचा “गोष्टीची शाळा” हा उपक्रम.

गोष्टीच  का ?

१) गोष्टी मुलांना खूप आवडतात.

२) विद्यार्थी गोष्ट सहज व आनंदाने आत्मसात करतात.

३) गोष्टींचे स्मरण चिरकाल राहते.

४) ऐकण्याबरोबर सांगण्याचा हि प्रयत्न करतात.

५) गोष्टी अभिव्यक्तीला वाव देतात.          

६) ऐकूण ,सांगून झाल्यावर लेखन सुद्धा करतात.

सुरुवात कशी झाली ?    

                              सुरुवातीला मी मुलांना शाळा सुटताना दररोज एक गोष्ट सांगायचो व ती ८ दिवसांनी अगदी १ महिन्याने विचारली तरी ते विसरत नसत.मग मी मराठी विषयातील पाठाच्या गोष्टी सांगू लागलो आणि मुले सहजपणे समजून घेवू लागले व सहज मनोरंजक आकलन होताना दिसू लागले.

                   दुस-या टप्प्यात  विद्यार्थ्यांना स्वंय अध्ययन च्या माध्यमातून तुम्ही स्वता पाठ वाचून छोटीशी गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले.मुले थोड्या प्रयत्नातून छोट्या छोट्या गोष्टी तयार करू लागले.मग त्यांना कोणत्याही गोष्टीत ठिकाण, पात्र, वेळ इत्यादी बाबीची माहिती दिली.मग मी ठरवले की आपण आपले अध्यापन कार्य याच पद्धतीने करण्याचे ठरवले  व हा  सर्वात सोपा मार्ग निघाला तो म्हणजे गोष्टी.

                   तिस-या टप्प्यात वाचून समजून घेतलेली गोष्ट वर्गात सर्वासमोर सांगण्याची संधी उपलब्ध करून देवू लागलो व काही मुले यामध्ये अपयशी ठरू लागले मग त्यांना tab देवून मैदानावर कोठे बसून तो स्वता व्हिडीओ रेकॉर्ड कर असे सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि मग त्यांना ते शक्य झाले.

                   पुढील टप्प्यावर मग आम्ही वर्गात laptop व प्रोजेक्टर वर मुलांना गोष्टी सांगण्याचा सराव घेवू लागलो व विद्यार्थी या सर्व बाबींशी परिचित असल्याने इतक्या अडचणी येत नव्हत्या. त्यांना मग बातम्या तिथेच दाखवायचो व याप्रमाणे आपणास बोलायचे आहे असे सांगितले की काही मुले अगदी त्याप्रमाणे सहज करू लागले.आठवड्यात १ किंवा २ वेळा सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित डिजिटल रूम मध्ये घेवून व्हिडीओ रेकॉर्ड घेतले तरी शक्य आहे जास्तीचा वेळ दररोज आवश्यक नाही.

                   शेवटच्या टप्प्यात प्रत्येकाला यासाठी एक वेगळी वही करून त्यात या गोष्टी लिहायला पण प्रोत्साहित केले.मग त्याचे टप्पे सांगितले त्याप्रमाणे ते त्या त्या गोष्टी सहजपणे करू लागले. आता पुस्तकातील पाठाच्या गोष्टी करून झाल्यावर चित्रावरून, दोन -तीन शब्दावरून किंवा अपूर्ण गोष्ट पूर्ण करा अशा पद्धतीच्या गोष्टी तयार करत आहेत.

                   सुरुवातीला आपण भाषा विषयासाठी याचा वापर करून त्यांनतर मग अगदी इतिहास, परिसर, व काही विद्यार्थी तर गणितातल्या ही गोष्टी तयार करत आहेत.

फायदे /फलनिष्पत्ती

१) यातून मुलांना स्वयं अध्ययनाची उत्तम सवय झाली.

२) श्रवण, वाचन, लेखन, संभाषण व सोबतच व्हिडिओ रेकॉर्ड या कौशल्याचा विकास होऊ लागला.

३) सहज ,चटकन व मनोरंजक तेतून आकलन क्षमता वाढू लागली .

४) गोष्टी लिहण्याचा त्यांना छान सराव होऊ लागला .

५) भविष्यात ते उत्तम वक्ते, निवेदक, लेखक होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करू लागले.

६) बहुवर्ग अध्यापन पद्धतीत याची उपयुक्तता होऊ लागली.

इतरांना उपयुक्तता

                सदर रेकॉर्ड केलेल्या गोष्टी युट्युब अथवा ड्राईव्ह ला अपलोड करून आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईट वर ठेवू शकतोत, तेथून इतर शिक्षक, पालक,विद्यार्थी  सहजतेने त्याचा वापर करू शकतात.प्रत्येक टप्प्याचे व्हिडिओ व माहिती सोबत दिलेली आहे त्याद्वारे त्याची राबवणूक करण्यास साह्य होते.whAtsapp वर लिंक पण शेअर करून इतरांना उपयुक्त ठरू शकते.काही शाळा याची माहिती घेवून त्याप्रमाणे प्रयत्न सुद्धा करत आहेत.

 

सारांश

        बहुवर्ग अध्यापानात येणा-या समस्या सोडवण्यासाठी व मुलांना आवडणा-या मनोरंजक पद्धतीने गोष्टीच्या माध्यमातून स्वंय अध्ययनास प्रोत्साहान देणारा व सर्व विषयासाठी वापर करता येणारा  असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांना भविष्यात उत्तम वक्ता,लेखक,पत्रकार , निवेदक होण्याची संधी याद्वारे निर्माण होते व याचे स्टोरेज शक्य असल्याने इतरांना मार्गदर्शक ठरत आहे. मुले वाचना  कडे आवडीने वळू लागले, नुसत्या पुस्तकातील अभ्यासाच्याच गोष्टी नाही तर इतर सुध्दा प्रत्येक विद्यार्थ्यास  जवळपास १०० गोष्टी आमच्या मुलांना येतात.

 

                                                             बालाजी बाबुराव जाधव ,उपशिक्षक.

                                                     जि.प. प्राथ. शाळा विजयनगर (पर्यती) ता. माण

                                                             जि. सातारा ७५८८६११०१५

                                                          www.shikshaknbhakti.in

Video - https://youtu.be/m486-lyd5oo